देवळा येथे आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक जागृतीवर कार्यशाळा संपन्न
प्रवीण आहेर देवळा/कळवण प्रतिनिधी:- कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, देवळा अर्थशास्त्र विभाग, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक जागृती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आणि उपस्थित नागरिकांना आर्थिक नियोजन, गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि बाजारातील चढ-उतारांविषयी माहिती देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणे हा होता.
स्वागत आणि प्रास्ताविक डॉ.राकेश घोडे यांनी केले आणि कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व आणि आजच्या काळात गुंतवणुकीचे योग्य ज्ञान असणे किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेचे मुख्य वक्ते म्हणून SEBI प्रमाणित स्मार्ट वित्तीय प्रशिक्षक श्री. प्रशांत कुमावत उपस्थित होते. कुमावत यांनी अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत आर्थिक गुंतवणुकीचे विविध पैलू समजावून सांगितले. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बाँड्स, सरकारी योजना आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांची सविस्तर माहिती दिली. तसेच, गुंतवणुकी करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक टाळण्याचे मार्ग आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे यावर विशेष भर दिला. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.आहेर यांनी अशा कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी SEBI आणि NSE यांचे महाविद्यालयासोबत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून देवळातील श्री जगदीश पवार यांचे चिरंजीव कुमार प्रथमेश पवार हे नुकतेच चार्टर अकांऊट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डि.के.आहेर, डॉ. जयवंत भदाणे, डॉ. विलास वाहुळे, डॉ.सुरवसे, डॉ.जयमाला चंद्रात्रे, प्रा. व्ही.डी.काकवीपुरे, डॉ. संजय बनसोडे, प्रा.चंद्रकांत दाणी, प्रा.बादल लाड, प्रा.अमित बोरसे कार्यालयीन अधीक्षक श्री. दिनेश वाघमारे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.दिनेश नाडेकर यांनी उपस्थितांचे आणि आयोजकांचे आभार मानले. त्यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
प्रवीण आहेर देवळा/कळवण प्रतिनिधी
Leave a Reply