दोदडगांव परिसरात हुमणी किड व्यवस्थापन मोहीम जनजागृती कार्यक्रम
क्रांतीभूमी मराठी न्यूज,,(पंढरीनाथ माळकरी ) : सद्यस्थितीत मे महिन्यातील मान्सून पूर्पावसाच्या आगमनामुळे वडीगोद्री मंडळातील ऊस पट्ट्याच्या काही गावांमध्ये ऊस पिकातील उपद्रवी कीड हूमनी अळीचे (उन्नी ) भुंगेरे शेताच्या बांधावरील लिंब, बाभूळ व चिंच या बहुवार्षिक झाडांवर दिसून येत आहेत, याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबडच्या वतीने मौजे दोदडगाव येथे प्रयोगशील शेतकरी अर्जुन बडे यांच्या शेतामध्ये हुमणी अळी एकात्मिक निर्मूलन जनजागृती कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला…
यावेळी तालुका कृषी अधिकारी अंबड बाळासाहेब गंडे कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांना म्हणाले की, हुमणीचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक रीतीने दोन ते तीन वर्षे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला 30 ते 35 मिली पाऊस झाल्यानंतर केल्यास चांगले परिणाम मिळणे शक्य आहे यासाठी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हुमणीचे भुंगेरे गोळा करण्यासाठी कडुलिंब, बोर, चिंच, शेवगा इत्यादी झाडांच्या बाजूला प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. तसेच झाडांच्या फांद्या हलवून झाडावरचे भुंगेरे खाली पाडावेत व ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे हा उपाय जोपर्यंत भुंगेरे जमिनीतून निघतात तोपर्यंत दररोज चालू ठेवला तर हुमणीचा बंदोबस्त फारच चांगल्या प्रकारे करता येईल…
हुमणी अळीच्या भुंगेर्यांचे एकात्मिक निर्मूलन करण्यासाठी वीस किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खाल्लेली आढळल्यास पाण्यात मिसळणारी 50 टक्के कार्बरील भुकटी 40 ग्राम किंवा क्वीनॉलफॉस 25 इसी 20 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 % एस. एल. 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी केल्यानंतर जर आठ तासांमध्ये पाऊस पडला तर पुन्हा फवारणी करावी. अशा प्रकारे कीटकनाशक फवारलेली पाने खाल्ल्यामुळे भुंगेऱ्यांचा बंदोबस्त होण्यास मदत होते तसेच वेळेवर अंडी घालण्यापूर्वी भुंगेर्यांचा नायनाट होतो व त्यामुळे हुमणीच्या पुढील उत्पत्तीस आळा बसतो अशी सहायक कृषि अधिकारी, अशोक सव्वाशे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली…
सदरील कार्यक्रमाला उप कृषि अधिकारी दादासाहेब धायतडक सह रामकिसन बडे, नामदेव बडे, अर्जुन बडे, शहादेव बडे, बाळू वाघ, रवींद्र बडे जीवन वाघ गोवर्धन वाघ बाबासाहेब वाघ इत्यादी शेतकरी उपस्थित होते…
Leave a Reply