खेड्यातील स्वप्न ते राज्याच्या कला सिंहासनापर्यंत !
दारव्हा तालुक्यातील गणेशपुरचा किशोर बनला राज्याचा कला संचालक
राज्याला १९ वर्षांनंतर मिळाला पूर्णवेळ कला संचालक
प्रतिनिधी: स्वप्निल चव्हाण दारव्हा यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेला मुलगा… लहानपनापासूनच कलेची आवड. ही आवड इतकी बहरली की, अखेर त्या मुलाने राज्याच्या कलाक्षेत्रातील सर्वोच्च पद गाठले. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. किशोर देवयानी इंगळे ! तालुक्यातील गणेशपूर या गावाचा सुपुत्र आता महाराष्ट्राच्या कला संचालनालयाचा पूर्णवेळ संचालक बनला आहे.
महाराष्ट्राला तब्बल १९ वर्षांनंतर एक पूर्णवेळ कला संचालक मिळाला असून ही नियुक्ती राज्याच्या कला क्षेत्रासाठी ऐतिहासिक मानली जात आहे. डॉ. किशोर इंगळे हे केवळ उत्कृष्ट चित्रकार नसून, एक संवेदनशील शिक्षक, उत्तम प्रशासक आणि विद्यार्थाभिमुख विचारवंतही आहेत.
नागपूरच्या शासकीय कला महाविद्यालयात ते २०११ पासून अध्यापन करीत आहेत. ग्राफिटी प्रकारातील त्यांच्या चित्रकलेला देश-विदेशात मान्यता मिळाली असून विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत त्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे. गाणेशपूर या गावातून शिक्षणाची वाटचाल सुरूकरत त्यांनी बोरी-अरब, दिग्रस आणि नंतर नागपूरपर्यंतचा शैक्षणिक प्रवास पार पाडला. नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात त्यांनी बीएफए, एमएफए व पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेतले. डॉ. इंगळे यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीतून कला संचालक पदासाठी निवडण्यात आले असून, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून त्यांच्या नियुक्तीला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. लवकरचते पदभार स्वीकारणार आहेत. विशेष बाब डॉ. इंगळे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे कला संचालक ठरले आहेत. अवघ्या वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या यशामागे केवळ कलाशक्ती नव्हे, तर समाजाशी असलेली नाळही महत्त्वाची आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे यवतमाळ येथे आले असता त्यांना भेट देण्यासाठी त्यांनी काढलेले चित्र स्वतः डॉ. कलाम यांनी स्वीकारून त्यांचे कौतुक केले होते. ते नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांसाठी ‘आविष्कार सेल’, ‘सांस्कृतिक समन्वय’ यासारखी उपक्रमशील भूमिका त्यांनी पार पाडली आहे. डॉ. इंगळे यांच्या या नेमणुकीमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा आणि विशेषतः दारव्हा तालुका आनंदित झाला आहे. एका छोट्याशा खेडेगावातून आलेल्या युवकाने मेहनतीने आणि चिकाटीने कलाक्षेत्रात उच्च शिखर गाठल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. एक कलाकार म्हणून सुरू झालेली वाटचाल आता संपूर्ण राज्याच्या कलाव्यवस्थेचे नेतृत्व करण्यापर्यंत पोहोचली आहे. गणेशपूरच्या या सुपुत्राचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे यात काही शंका नाही!.
Leave a Reply