स्त्रियांनी केवळ शिक्षित न होता सुशिक्षित होणे ही काळाची गरज: प्राचार्या आर.एस.पाटील.
देवळा प्रतिनिधी (प्रवीण आहेर ).: स्त्रीला काहीच कळत नाही हा दृष्टिकोन समाजात आहे, तो बदलायला हवा. केवळ शिक्षित न होता सुशिक्षित होणे आवश्यक आहे. पुरुष वर्गाने महिलेला होणारा त्रास समजून घेणे हेच खरे शिक्षण आहे. महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे मत, आरोग्य व अस्तित्व जपले पाहिजे. समाजाचा विकास हा स्त्री शिक्षणावरच आधारित आहे असे मत डॉ.आर.एस.पाटील यांनी आयोजित महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेत व्यक्त केले.
आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मानूर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.भामरे होते. प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील (प्राचार्या,श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय,मालेगाव) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.वंदना खैरनार (आहारतज्ञ, उपजिल्हा रुग्णालय, कळवण), ॲड.हेमांगी आहेर (तालुका न्यायालय कळवण) उपस्थित होते.
कार्यशाळेत बोलताना डॉ.वंदना खैरनार यांनी स्त्रीचे आरोग्य आणि आहार हे तिच्या सशक्ततेसाठी महत्त्वाचे आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर आचरण, वक्तृत्व व आहार या तिन्ही बाबींमध्ये शुद्धता आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. ॲड.हेमांगी आहेर भारतातील कायदा व्यवस्थेत अनेक कायदे महिलांसाठी आहेत थोडक्यात कायदे महिलांना माहित असणे आवश्यक आहे. महिलांनी आत्मपरीक्षण करून मानसिकता बदलावी असे प्रतिपादन केले. १९ व्या शतकात महिला सशक्तीकरण हा विचार भारतात पोहोचला. समाज सुधारण्यासाठी शिक्षण आणि कायदे महत्त्वाचे आहेत. स्त्रीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आर्थिक सशक्तता अत्यंत आवश्यक आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात श्रेष्ठ आहे, पण ती टिकवण्यासाठी महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे असे मत कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.पी.भामरे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा.एम.आर.बागुल यांनी केले. प्रास्ताविक प्रा.ए.डी.पानगव्हाणे, आभार प्रा.पी.ए.सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी विद्या देवरे (उपमुख्याध्यापिका, जनता विद्यालय, मानूर), परीक्षाधकारी प्रा.एस.एल.पवार, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पी.के.आहेर सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply